"कसब्याची निवडणूक बिनविरोध करणे हीच मुक्ता टिळकांना श्रद्धांजली ठरेल", भाजपचे सर्वपक्षियांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 03:48 PM2023-01-31T15:48:46+5:302023-01-31T17:24:39+5:30
भाजपकडून ही जबाबदारी ही पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आली आहे
पुणे: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वानीच जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून कसबा निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करणारे पत्र भाजपच्या वतीने सर्वपक्षियांना देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि पुण्यातील सर्वपक्षांच्या शहर अध्यक्षांना पत्र लिहून पुणे शहर भाजपच्या वतीने कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजपकडून ही जबाबदारी ही पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. मिसाळ या आता सर्वपक्षांच्या प्रमुख नेत्यांना ही पत्राद्वारे कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करणार आहे.
पत्रात काय नमूद केलंय?
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या दुःखद निधनाने कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अग्रेसर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा राजकीय वारसा मुक्ताताई समर्थपणे पुढे चालवत होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लढवय्या, निर्भिड नेते अशी लोकमान्य टिळकांची ओळख होती. मुक्ताताईंनी सर्व समाज घटकांना बरोबर घेत गेली वीस वर्षे पुणे शहरात विकासाचे कार्य केले. त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी अतिशय सौहार्दपूर्ण संबंध होते. अजातशत्रू व्यक्तिमत्व अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती.
महाराष्ट्राची अशी वैशिष्ट्यपूर्ण राजकीय संस्कृती आहे. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपला पक्षानिवेश बाजूला ठेवून परस्परांशी उत्तम संबंध प्रस्थापित करतात. विकासकामात कधीच राजकारण येऊ देत नाहीत. तसेच निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सर्वानुमते बिनविरोध निवडणूक केली जाते.
आपल्या राज्याची ही वैभवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. याच भूमिकेतून नुकतेच अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिला नाही. राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने विरोधकांच्या विनंतीला मान देत उमेदवार न देता बिनविरोध निवडणूक केली होती. त्याच प्रकारे पुणे शहरातील कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती मी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना करीत आहे. मुक्ताताईना तीच खरी आदरांजली ठरेल.