पुणे: अँमिनिटी स्पेस घोटाळा स्वाहा, ई-व्हेईकल घोटाळा स्वाहा, पार्किंग पॉलिसी स्वाहा, सिक्युरिटी टेंडर स्वाहा, १४ लाखांचे झाड स्वाहा, सायकल प्रकल्प स्वाहा, 24×7 पाणी योजना स्वाहा, अशा प्रकारच्या सर्व घोटाळ्यांच्या उद्घोषणा करून राष्ट्रवादीच्या वतीने पुणे महापालिकेसमोर हवन करत आंदोलन करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये मंगळवारी 'सिग्नल'च्या देखभालीसाठी तब्बल ५७.९४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. गरज नसलेल्या कामावरील खर्चाचे नवे 'रेकॉर्ड' सत्ताधारी भाजपने केले आहे . याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये असलेल्या भस्मासुरचा अंत होणासाठी प्रतिकात्मक(उपरोधक) आंदोलन केले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ''कोणते सिग्नल स्मार्ट होणार, नेमका खर्चाचा अंदाज, या बाबतीत कोणताही विचार विनिमय न करता विदिया टेलिलिंक्स या कंपनीच्या भल्यासाठी तब्बल ५८ कोटींचा निधी महापालीकेने मंजूर केला आहे. सत्तधाऱ्यांना भाजपला ठेकेदारांचा नेमका एवढा पुळका कां आहे हे कळायला तयार नाही. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली सत्तेत आलेले भाजप हे एकामागे एक भ्रष्टाचाराचा इतिहास रचत आहेत. दररोज भाजप भ्रष्टाचाराचे नवनवीन उच्चांक गाठत आहे. कुठलाही केवळ नवीन सिग्नल बसवणार नसतांना केवळ जुन्या सिग्नलच्या देखभालीसाठी ५८ कोट रुपये देणे म्हणजे पुणेकरांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांची अश्या प्रकारे लूट कधीही होऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल तो त्रास भोगायची आमची सर्वांची तयारी आहे.''
यावेळी दिपाली धुमाळ, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, प्रदीप देशमुख, प्रदीप गायकवाड, महेंद्र पठारे, नंदा लोणकर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.