पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी (BJP Medha kulkarni) नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता ही नाराजी कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली आहे. शनिवारी पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौक पुलाचे उद्घाटन आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह भाजपचे बडे नेते येणार आहेत. पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोथरूडच्या आमदार असताना त्यांनी चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख खुद्द गडकरी यांनी भाषणात केला होता. आता या सोहळ्यालाच स्वःपक्षीय नेत्यांकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उपरेपणाची वागणूक मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ही नाराजी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून व्यक्त केली. त्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला".
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी' चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही.
माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे, अशी नाराजीची पोस्ट करत कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
भूसंपादनासह अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शनिवारी (दि. १२) केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौकातील मार्गाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार असून, यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.