पुणे: दादा पाटील उर्फ चंद्रकांत पाटील. राज्य मंत्रीमंडळात प्रथमच समावेश झाल्यानंतर काही महिन्यातच मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाव येऊ लागलेले व तरीही पाय जमीनीवर ठेऊन पक्षवाढीसाठी काम करणारे महसूलमंत्री. पुण्याचे तात्पुरते पालकमंत्री म्हणून नियुक्ती केल्यानंतर लगेचच आता त्यांची थेट भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर निवड केली. तीदेखील पक्षाच्या केंद्रीय वर्तुळातून. त्यामुळेच पक्षाबाहेरच्यांबरोबरच पक्षातीलही अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पक्षातील काही सुत्रांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांना त्यांना संघटनेतच पाठवायचे होते. ती संधी रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्यामुळे त्यांना सहज मिळाली. त्यामुळेच पुढे पुन्हा सत्ता आल्यानंतर पाटील मंत्रीमंडळात असतीलच असे नाही. एक-एक स्पर्धक हलकेच बाजूला करत जायचा ही मुख्यमंत्र्यांची खेळी पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्तीने यशस्वी झाल्याचे पक्षात कुजबूजत्या स्वरात बोलले जात आहे.
पुणे शहर भाजपातचंद्रकांत पाटील यांचे वेगळे स्थान आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पक्षाने त्यांच्याकडे बारामतीची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे इथल्या बऱ्याच कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा चांगला संपर्क आला. काहीजणांना ते तिकडे घेऊन गेले व तिथेच त्यांच्यावर काही जबाबदाऱ्याही सोपवल्या. पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात चांगलीच हवा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला त्यांनी राजकीय भाषेत सांगायचे तर चांगलाच टाईट करून टाकला. इतका की जागा ताब्यात येणार अशीच चर्चा सगळीकडे सुरू झाली.
मात्र तेव्हाही पाटील यांचे पाय जमीनीवरच होते. पुण्यात गिरीश बापट निवडून आले व पालकमंत्रीपद रिक्त झाले. पाटील यांच्याशिवाय दुसरे नावच त्या पदासाठी नव्हते. या पदावर डोळे लावून असलेल्या काहींना त्यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवल्यामुळे मिरच्या झोंबल्या खऱ्या, मात्र काहीच करता येण्यासारखे नसल्याने त्यांना गप्प बसावे लागले. पाटलांनीही शांतपणे पद स्वीकारले, लगेचच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठका वगैरे सुरू केल्या, अधिकाऱ्यांना त्यांनी काय करावे याची जाणीव करून दिली व नियमित कामकाज सुरूही केले. कोणाला जवळ करणे नाही व कोणाला लांब ठेवणेही नाही अशा पद्धतीचे त्यांचे काम आहे.
आता प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. गेली ४० वर्षे पाटील हेच काम करत आहेत. संघटन वाढवण्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील प्रदीर्घ अनूभव त्यांच्या खाती जमा आहे. पक्षातील काही सुत्रांनी सांगितले, की पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी म्हणून त्यांच्यावर खास जबाबदारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले काम पक्षातील केंद्रीय नेतृत्त्वाच्या पसंतीस पडले. विधानसभा निवडणुकीत झालाच तर धोका याच भागातून होऊ शकतो याची खात्री केंद्रीय नेतृत्त्वाला असल्यामुळेच याच भागातील नेत्याला प्रदेशाध्यक्षपद द्यायचा निर्णय घेतला. अनेक वर्षांनी पश्चिम महाराष्ट्राला हे पद मिळाले आहे. राजकीय धुळवडीमध्ये गेल्या पाच वर्षात पाटील यांचे नाव बरेच उंचीवर गेले आहे, आता प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने त्यावर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची मोहर उमटली आहे.