लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची मोबाइलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून विरोधकांकडून भाजपवर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, ही खोटी व बनावट ऑडिओ क्लिप असून त्यातील आवाज हा आपला नसल्याचा दावा आमदार सुनील कांबळे यांनी केला आहे.
संबंधित महिला अधिकारी या महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाइलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. बिले काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असे म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न करत अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केली.
संबंधित महिला अधिकाऱ्याने फोन कार्यकर्त्यांच्या हातात दिला. त्यावर कांबळे यांनी कार्यकर्त्याला फोन स्पीकरवर ठेवायला सांगून पुन्हा शिवीगाळ केली. तसेच काही पुरुष अधिकाऱ्यांचे नाव घेत त्यांच्याही नावे शिवीगाळ करीत त्यांना धमकावले. या मोबाइल रेकॉर्डिंगचे संभाषण आता व्हायरल झाले असून, ते काही महिन्यांपूर्वीचे आहे.
..
पुणे महापालिकेच्या महिला कर्मचारी यांना बिल काढण्याच्या कारणावरून भाजप आमदाराकडून अत्यंत घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या जातात. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा लोकप्रतिनिधींना मनसे अजिबात सोडणार नाही. सुनील कांबळे तुम्ही आमदारांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही. तुम्हाला पुण्यातील महिला वर्ग सूट देणार नसल्याचा इशारा मनसेच्या रूपाली पाटील यांनी यावेळी दिला आहे.
......
संबंधित ऑडिओ क्लीपची सखोल चौकशी करावी व त्याच्या सत्यतेनंतर संबंधितावर कठोर कारवाई व्हावी, तसेच संबंधित महिला अधिकाऱ्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रदीप देशमुख यांनी केली आहे.
.....
आपण महापालिकेच्या एका महिला अधिकाऱ्यांना फोनद्वारे शिवीगाळ केल्याची खोटी ऑडिओ क्लिप प्रसारित केली जात आहे. त्यातील आवाज हा माझा नाही. ही क्लिप संपूर्णत: बनावट असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपली बदनामी करण्याचे हे राजकीय कारस्थान आहे, असा दावा आमदार सुनील कांबळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.