पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या लाईफसपोर्टवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बापट यांच्या प्रकृतीची पुढील अपडेट दुपारी दोन वाजता कळविण्यात येईल असं दीनानाथ रुग्णालयाचे माहिती अधिकारी शिरीष याडगिकर यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून गिरीश बापट यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता झालेल्या कसबा विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारात भाग घेत भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्यासाठी सभाही घेतली होती.
खासदार गिरीश बापट महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, पालकमंत्री तसेच राज्यात मंत्री अशा विविध पदावर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड आहे. ते शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.