पुणे: माझं मेरिट, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंबा लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा मला पुण्यातून उमेदवारी देईल, असे भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सांगितले. ते शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वत:च केलेल्या सर्वेक्षणातील निरीक्षणे प्रसारमाध्यमांसमोर मांडली.आगामी निवडणुकीत मला पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशी इच्छा मी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. भाजपा माझी ही मागणी नक्की मान्य करून मला खासदारकीचे तिकीट देईल. पुण्यातील प्रत्येक प्रभागात असलेलं माझं नेटवर्क आणि तरूण कार्यकर्त्यांचा मला असलेला पाठिंबा पाहता विद्यमान खासदार अनिल शिरोळेंऐवजी मला उमेदवारी मिळायला हवी. माझं मेरिट आणि आत्तापर्यंतचे काम पाहता भाजपा मला नक्कीच उमेदवारी देईल. या निवडणुकीत मी साडेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील 8 पैकी 4 आमदारांचे भवितव्य धोक्यात असल्याचा इशाराही काकडेंनी दिला. परंतु पक्षाने मला लोकसभेची उमेदवारी दिल्यास मी आत्तापासूनच काम करून परस्थिती सुधारू शकतो, असे काकडे यांनी सांगितले. काकडे यांच्या या वक्तव्यानंतर अन्य भाजपा नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात भाजपाचे तिकीट मलाच; संजय काकडेंचा 'स्वराज्यभिषेक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 11:40 AM