पिंपरी : सांगवीतील स्मशानभूमीच्या कामांवरून राष्टÑवादी काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. मलई मिळत नसल्याने स्मशानभूमीचे काम रखडले आहे, असा आरोप माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे यांनी भाजपावर केला आहेत. तर ‘शवदाहिनीत मलई कोणी खाल्ली?’ असा उलट प्रश्न नगरसेवक हर्षल ढोरे यांनी उपस्थित केला.
सांगवीतील स्मशानभूमीचे काम एक ते दीड वर्षापासून संथ गतीने चालू आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना या स्मशानभूमीच्या जुन्या कामातून मलई मिळत नाही, म्हणून त्यांच्याकडून काम करू दिले जात नाही.भाजपाला काम करत येत नसून नवीन लोकांना मलई खाण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सांगवी स्मशानभूमीची जागा मालकांनी अडवणूक न करता रीतसर मोबदला देण्याची मागणी केली. तथापि, भाजपा नगरसेवकांकडून स्वत:ला मलई मिळावी म्हणून कामाशी संबंधित सगळ्यांना ब्लॅकमेल करुन धमकाविले जात आहे, अशी टीका प्रशांत शितोळे यांनी केली.सांगवीतील रखडलेल्या स्मशानभूमीच्या कामांवरून प्रशांत शितोळे यांनी भाजपावर केलेल्या टीकेला भाजपा नगरसेवक हर्षल ढोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘‘सांगवीतील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधींची मलई कोणी खाल्ली, हे शहरातील जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. स्मशानभूमीच्या जागेचाही मोबदला मागितला आहे. या जागेच्या सातबारा उताऱ्यावर अनेक नागरिकांची नावे आहेत. त्यात शितोळे हे देखील नाव आहे. त्यामुळे आपणाला मोबदला मिळावा म्हणून शितोळेंनीच स्मशानभूमीचे काम बंद पाडले. ठेकेदार त्यांनीच पोसला आहे. त्यानेही प्रशासनाकडे काम पूर्ण व्हावे यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यासाठी पाठपुरावा केला नाही.’’