पिंपरी : महापालिका सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी खाडे यांनी विरोधी पक्षातील नगरसेविका सीमा सावळे यांच्यासमोर दंड थोपटल्याचा निषेध भारतीय जनता पक्षाने केला आहे. महिलांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्या पक्षातील नगरसेवक सभागृहात महिलेचा अपमान करतात, अशा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने पत्रकार परिषद घेऊन केली आहे.घरकुलातील गैरव्यहारप्रकरणाचे शुक्रवारी झालेल्या महासभेत पडसाद उमटले होते. भर सभागृहात नगरसेविका सीमा सावळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी खाडे यांच्यात जुंपली होती. खाडे यांनी दंड थोपटल्याने सावळे याही संतप्त झाल्या होत्या. याबाबतचे समर्थन करण्यासाठी राष्ट्रवादीने समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि सावळेवर हल्लाबोल केले होते. त्यानंतर रविवारी भाजपाने पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केले. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसने दादागिरीच्या जोरावर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील गोरगरीब पात्र लाभार्थ्यांना हुसकावून लावून बोगस लाभार्थ्यांना बनावट कागदपत्रे बनवून दिली. त्यांना पात्र ठरवून घर दिले. खऱ्या लाभार्थ्यांना देशोधडीला लावले. त्याचे पुरावे सादर करून ते सिद्धही करून दाखविले आहे. बोगस लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी खाडे आणि त्याचे बंधू यांनी काही गोरगरीब महिलांकडून शरीरसुखाची मागणी केली होती. आता पोलीस चौकशीत हे समोर येणारच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने झोपडपट्टी पुनर्वसनात बोगस लाभार्थी घुसविण्याच्या प्रकरणाविषयी जनतेला सत्य ते काय सांगावे. झोपडीधारकांना पुनर्वसनांतर्गत मोफत घरे देण्याची कायद्यातच तरतूद आहे. परंतु, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गोरगरीब झोपडीधारकांनाही सोडले नाही. त्यांच्याकडून दहा टक्के स्वहिस्सा घेऊनच पुनवर्सनातील घरे दिली आहेत.’’सारंग कामतेकर म्हणाले, ‘‘रेड झोनबाबत आम्ही पहिली याचिका दाखल केली नव्हती. एसएन असोसिएट्स या बांधकाम व्यावसायिकाला तळवडेतील एका बांधकामासाठी महापालिका परवानगी देत नव्हती. त्यामुळे हा बांधकाम व्यावसायिक न्यायालयात गेला. महापालिकेने हे बांधकाम रेड झोनमध्ये येत असल्यामुळे बांधकाम परवानगी देता येत नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. त्याच्या आधारे न्यायालयाने बांधकामाला स्थगिती दिली. आम्ही २०१२ ला याचिका दाखल केली.’’जगताप म्हणाले,‘‘महिला सदस्याला अवमानकारक वागणूक देणे चुकीचे आहे. भाजपाच्या महिला सदस्यांना कोणी अवमानकारक वागणूक दिल्यास पोलीस कारवाई करण्यात येइल.’’ (प्रतिनिधी)
घरकुलावरून भाजपा-राष्ट्रवादी वाक्युद्ध
By admin | Published: December 26, 2016 3:29 AM