पुणे : पुण्यातील राजकीय घडामोडी आणि सत्ता समीकरणांची देशपातळीवर नेहमीच चर्चा होत असते. राजकीय मतभेद असले तरी एकमेकांप्रती सद्भाव आणि मैत्री जपणारे शहर म्हणून पुण्याची ख्याती आहे. त्याचाच प्रत्यय पुणेकरांना पुन्हा आला. राष्ट्रवादीच्या नूतन शहर कार्यालयाला भाजपाचे खासदार, शहराध्यक्ष, महापौर यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांसह भेट देत ‘राष्ट्रवादी’चा पाहुणचार घेतला. या वेळी हलक्या-फुलक्या वातावरणात राजकीय गप्पाही रंगल्या होत्या.
महापालिकेजवळील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले. या कार्यालयाला भेट देण्याचे निमंत्रण ‘राष्ट्रवादी’कडून भाजपाला देण्यात आले होते. त्याचा स्वीकार करून खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी प्रमुखांसह अनेक भाजपा नगरसेवक-पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला भेट दिली. ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्वांचे स्वागत केले.
पालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जवळ येऊ लागल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपाकडून राज्य सरकार आणि मंत्री ‘टार्गेट’ केले जात आहेत. तर, राष्ट्रवादीने पालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपाला ‘शह’ देण्यास सुरुवात केली आहे.
अशा राजकीय गदारोळात भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात हलक्याफुलक्या गप्पा झाल्या. यासोबतच एकमेकांना कोपरखळ्याही मारण्यात आल्या. शुक्रवारी झालेल्या या भेटीमुळे पुण्यातील या राजकीय मैत्रीची चर्चा रंगू लागली आहे.
चौकट
निव्वळ भेट की भविष्यातील ‘पुणे पॅटर्न’ची पुनरावृत्ती?
भाजपाच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला दिलेली भेट केवळ औपचारिक होती की जुळवाजुळवीची तयारी अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू झाली. यापूर्वी राष्ट्रवादी-भाजपा असा सत्तेचा ‘पुणे पॅटर्न’ राज्याने अनुभवलेला असल्याने ही निव्वळ सदिच्छा भेट होती की भविष्यातील ‘पुणे पॅटर्न’ची रंगीत तालीम अशी चर्चा त्यामुळेच जोर धरत आहे.