पुणे : भाजपा-राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला कलगीतुरा हा दिखावा असून पदवीधर मतदारांना असली शेरेबाजी आवडत नसल्याचे मत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले. हा कलगीतुरा चालेल तेवढा चालेल असे म्हणत त्यांनी थेट भाष्य करणे टाळले.
मनसे उमेदवार रुपाली पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी, पाटील यांच्यासह नगरसेवक वसंत मोरे, बाबू वागस्कर, गणेश सातपुते, किशोर शिंदे, मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे-पाटील, लावण्या शिंदे आदी उपस्थित होते.
सरदेसाई म्हणाले, भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांविरुद्ध बोलत असून हा कलगीतुरा चालेल तेवढा चालेल. गेले काही दिवस भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक विशेषणांवर त्यांनी टीका केली. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना सातारा जिल्ह्यातून जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटकही केली. याबाबत सरदेसाई काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. परंतु, त्यांनी याविषयावर बोलणे टाळले. त्यांना प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
भाजपावरही थेट बोलणे टाळले...
गेल्या काही दिवसांपासून भाजपा मनसेला सोबत घेणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी भाजपावरही थेट बोलणे टाळले. यावेळी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सरदेसाई यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.