पुणे: काळा रंग हा निषेधाचे प्रतीक मानला जातो. पंतप्रधाननरेंद्र मोदी मंगळवारी (दि. १) पुणे दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या तिन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी काळे कपडे किंवा तत्सम काळ्या गोष्टींच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. मोदी यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले अन् मोदींनी छत्री उघडली ती ‘काळी’च असल्याने पुणेकरांच्या भुवया उंचावल्या. इतकंच काय? त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यास आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही काळे कपडे परिधान केल्याचे दिसल्याने सोयीनुसार ‘काळ्या’ रंगावर बंदी का? अशा चर्चांना उधाण आले होते.
एखाद्या गोष्टी किंवा कृतीबाबत विरोध अथवा निषेध व्यक्त करायचा असेल तर काळे झेंडे दाखविले जातात किंवा काळ्या फिती लावून आंदोलन केले जाते. त्यामुळे भाजपच्या लोकांसह प्रशासनानेही ‘काळ्या’ रंगाचा जणू धसकाच घेतल्याचे पाहायला मिळाले. मोदी पुण्यात येत असताना ‘काळा’ रंग अधिक उठून दिसू नये, यासाठी काळ्या रंगाचे कपडे किंवा गोष्टी वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. काळ्या रंगाचे कपडे घातलेल्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे काही पुणेकरांना माघारी फिरावे लागले. दरम्यान, एकीकडे पुणेकरांना काळे कपडे परिधान करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला होता. तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मात्र काळ्या कपड्यांबाबत कोणतेच नियम लागू करण्यात आले नव्हते.
मोदी यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जॅकेट आणि पँटही काळ्या रंगाचीच होती. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांनी ‘काळ्या’ रंगाचे नियम फक्त सामान्यांनाच का? असा सवाल उपस्थित केला.