पुणे : देशभरात भाजपविरोधी जनमत तयार होत आहे. त्यामुळेच पराभवाच्या भीतीने केंद्र सरकारने देशातील सर्व कॅन्टोन्मेटच्या (छावणी मंडळ) निवडणुकांना स्थगिती दिली आहे, अशी टीका काँग्रेसने केली. लोकशाहीत जगण्याचा तेथील नागरिकांचा हक्कच केंद्र सरकार काढून घेत असून, अशीच स्थिती देशातील सर्वच जनतेवर येऊ शकते, असे काँग्रेसने म्हटले आहे.
याबाबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, देशात सर्वत्र महागाई वाढली आहे. केंद्र सरकार त्यावर काहीच उपाय करायला तयार नाही, त्याऐवजी मोठ-मोठ्या उद्योगपतींना थेट केंद्रांकडून अभय दिले जात आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा बेसुमार वापर सुरू आहे. या सर्व गोष्टींमुळे भाजपच्या केंद्र सरकारविषयी लाेकांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसते. कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला हे त्याचेच द्योतक आहे. त्याआधी दिल्ली, पंजाब या राज्यांमधील जनतेनेही त्यांना पराभवाच्या खाईत लोटले.
कॅन्टोन्मेटची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. निवडणूक अधिकारी नियुक्त केले होते. मात्र, जनमत विरोधात जाईल, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम होईल हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऐनवेळी सर्व कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका स्थगित केल्या तेथील जनतेचा लोकशाहीत जगण्याचा हक्क काढून घेतला, असेही जोशी म्हणाले. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका याच पद्धतीने थांबविण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने तातडीने सर्व कॅन्टोन्मेंटमध्ये आधी जाहीर झाल्या त्याप्रमाणे निवडणुका घ्यावात, अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे जोशी यांनी सांगितले.