पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या हस्ते मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उदघाटन असे कार्यक्रम होणार आहेत.
याबाबत सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दौऱ्याचा आढावा घेतला. तसेच नियोजित कार्यक्रमांची माहिती घेऊन चर्चा केली. सत्ताधारी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली जात आहे. त्यांच्या हस्ते निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचा सत्ताधारी भाजपचा मानस आहे.
जाणून घ्या पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा
- पंतप्रधान मोदी यांचे ६ मार्च रोजी सकाळी १०:३० मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होईल. - महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमाला जाणार आहेत. - मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर जातील. तेथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.- मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जंगी सभा होणार आहे. - सभेनंतर हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत. - दुपारी ३ च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.