पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे युवा नेते, माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात आता रंगत आली आहे. पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदारसंघात लढण्याची आमची इच्छा आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे सगळ्यांनी मिळून काम करायचे आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे. आज मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशावेळी खासदार संजय राऊत यांनी भोसरी हा शिवसेनेचे बालेकिल्ला असल्याचे उल्लेख करून या जागेसाठी महाआघाडीत आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख सचिन अहिर, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, माजी पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसवेक धनंजय आल्हाट उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात भाजप ज्यांनी रुजवली आणि वाढली अशा दिवंगत शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचा सख्ख्या पुतण्या तसेच दिवंगत विरोधी पक्षनेते बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव आहेत. रवी लांडगे यांच्यामुळे आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यापासून लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. लोकसभेतही रवी लांडगेनी घड्याळाचा प्रचार दणक्यात केला. मात्र, भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या रवी लांडगे यांना महायुतीतून उमेदवारी मिळणार नाही हे उघड होते. म्हणूनचं रवी लांडगे यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आधीचं शरद पवार गटात प्रवेश करत, तुतारीसाठी भोसरी विधानसभा मतदरसंघात दावा केला आहे. मविआमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला ही मिळेल, ही शक्यता गृहीत धरून रवी लांडगे मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत रवी लांडगे यांनी आज प्रवेश केला आहे.