पुणे : भाजपचे सर्व नगरसेवक चांगले काम करत आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना पुण्यात मोठ्याप्रमाणावर निधी दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातूनही शहरात मोठे प्रकल्प सुरू आहेत. भाजपने पुणेकरांना दिलेला शब्द पाळला असल्याने, आगामी निवडणुकीमध्ये भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक महापालिकेत असतील. असे सांगून खासदार गिरीश बापट यांनी २०२२ मध्ये होणार्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.
शहर भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भाजप नगरसेवकांसोबतच्या बैठकांमध्ये नगरसेवकांनी केलेली विकास आणि सामाजिक कामे, उभारलेले प्रकल्प, अर्धवट प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी आवश्यक निधी आदींबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बापट यांच्यासह शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी माहिती दिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे याप्रसंगी उपस्थित होते.
बापट म्हणाले, केंद्र सरकारच्या अनेक योजना पुण्यात सुरू आहेत. मागील राज्य शासनाने महापालिकेला मोठा निधी दिला आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने अद्याप काहीच निधी दिला नाही. तरीही या काळात नगरसेवकांनी विशेषतः सामाजिक काम खूप केले आहे. कोरोनाचे संकट यशस्वीपणे हाताळले.
प्रभागातील छोटी छोटी कामे व्हावीत अशी नागरिकांची मागणी असते. स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. कराच्या दंडात सवलत देऊन महापालिकेला उत्पन्न मिळवून द्यायचा प्रयत्न केला. स्थायी समिती अध्यक्ष व पदाधिकार्यांनी यासाठी सकारात्मक भुमिका पार पाडली. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. भामा आसखेड प्रकल्पातील शेतकर्यांचे पुनर्वसन केले. यासाठी महापालिकेने सुमारे २०० कोटी रुपये निधी दिला. विमानतळ, नदी सुधार योजना, मेट्रो प्रकल्पाची कामे पुढे नेली. पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार. परंतु यावेळी पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणू असा मला विश्वास आहे. गावे समावेश करण्यास विरोध नाही. परंतु तेथील गावात सुविधा करण्यास राज्य शासनाने निधी दिला पाहिजे. आतापर्यंत जिल्हा परिषदेत ही गावे होती. तेथे कामे करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस कामे करण्यास कमी पडले. हे अपयश झाकण्यासाठी गावे पालिकेत घेण्याचा घाट घातला आहे. - जगदीश मुळीक, शहर अध्यक्ष, भाजप---------