केडगाव: ग्रामपंचायत ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अवघड निवडणूक आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तालुक्यात भाजपला यश मिळाले. सरपंच, उपसरपंच निवडीमध्येही ५१ पैकी २७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच तर ३३ गावांमध्ये उपसरपंच भाजपचेच असल्याचा दावा आमदार राहुल कुल यांनी केला.
चौफुला येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आला. पुस्तक, श्रीफळ असे या सत्काराचे स्वरुप होते. यावेळी माजी आमदार रंजना कुल, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुल, वासुदेव काळे, आनंद थोरात, तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संजय काळभोर , गणेश आखाडे, धनाजी शेळके,माऊली शेळके आदी उपस्थित होते.
राहुल कुल म्हणाले की, दौंड येथील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये भाजपला तालुक्यात निर्विवाद यश मिळाले आहे. ५१ पैकी २७ सरपंच भाजपाच्या व्यासपीठावर सत्कारासाठी जरी आली असले तरी भांडगाव, लडकतवाडी, खामगाव व हातवळण या चार गावांमध्ये स्थानिक तडजोडी नुसार प्रथम काही वर्ष सरपंचपद राष्ट्रवादीला गेले आहे. पुढील अडीच वर्षांमध्ये तेथे भाजपाचा सरपंच असणार आहे.
बोरीपार्धी येथे भाजपच्या आनंद थोरात यांच्या विचारांचा सरपंच आहे. तसेच पडवी येथे भाजपची सत्ता आली आहे तरी तेथे आरक्षणानुसार सदस्य नसल्याने सरपंच पद रिकामे आहे. परंतु येथील उपसरपंच पद भाजपचा झाला आहे. तसेच खोर येथे ११ पैकी ८ सदस्य निवडून येऊन संबंधित आरक्षणाचा सदस्य निवडून आलेला नाही त्यामुळे सरपंच पद राष्ट्रवादीला गेले आहे. त्यामुळे भविष्यात भाजपाच्या सरपंचाची संख्या ३१ पर्यंत वाढणार आहे.
मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये यवत, गोपाळवाडी, कानगाव ,खडकी, गिरिम ,पिंपळगाव, नांनगाव, खामगाव या गावांमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले आहे. याबद्दल दौंडकरांचा मी यासाठी आभारी आहे. केंद्रशासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कटिबद्ध राहा. या कामी आमदार म्हणून मी सर्वतोपरी सहकार्य करील, असे आश्वासनही कुल यांनी दिले.
१५ केडगाव
चौफुला येथील भाजप नवनिर्वाचित पदाधिकारी मेळाव्यात बोलताना दौंडचे आमदार राहुल कुल.