पिंपरी : उद्योगनगरीतील मावळ, पिंपरी, चिंचवड व भोसरी या चारही मतदारसंघात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात इच्छुकांनी बंडखोरीचे निशाण फडकविले आहे. मावळात भाजपाला बंडखोरी मागे घेण्यात काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, राष्ट्रवादीपुढे बंडखोरीचे आव्हान कायम आहे. चिंचवड मतदारसंघात भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पिंपरीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना उमेदवारांच्या विरोधात स्वकीयांसह काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. चारही मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी शनिवारी झाली. या वेळी १५ अर्ज अवैध ठरले असून, त्यामध्ये चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे व पिंपरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर- शीलवंत यांचा अर्ज एबी फॉर्मच्या गोंधळामुळे रद्द झाला आहे. मात्र, पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवारी बदलून माजी आमदार अण्णा बनसोडे यांना दिली. त्यामुळे सुलक्षणा धर शिलवंत यांच्यासह माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी बंडखोरीचे अपक्ष अर्ज कायम ठेवले आहेत. त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करीत आहेत. तसेच, पिंपरीतील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भाजपाचे पदाधिकारी व अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ व रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज कायम ठेवले आहेत. त्यांचे अर्ज मागे घेण्याचे आव्हान युतीच्या नेत्यांपुढे आहे. मावळ मतदारसंघात भाजपाचे उमेदवारांविरोधात युवा मोर्चाचे नेते रवींद्र भेगडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, भाजपातून बंडखोरी करून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सुनील शेळके यांच्या विरोधात नाराजी आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावंत बाळासाहेब नेवाळे व नगरसेवक किशोर भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तरी पक्षाला आपली ताकद दाखवून देण्याचे आव्हान दिले आहे.इतके दिवस आम्ही राष्ट्रवादीसाठी एकनिष्ठपणे व प्रमाणिकपणे काम केले. विधानसभा निवडणुकीची तयारी केली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आयात उमेदवार उमेदवाराला संधी दिल्याने मावळातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते व कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा फटका सुनील शेळके यांना बसू शकतो. त्यामुळे या नाराजांची समजूत काढून त्यांना सक्रिय करण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आहे. ...........
लक्ष्मण जगताप यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादीची पुरस्कृत राहुल‘नीती’?चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज एबी फॉर्मच्या गोंधळामुळे अवैध ठरला. त्यामुळे चिंचवडमधील भाजपाचे नेते व कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु, युतीमध्ये बंडखोरी करून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. अर्जाच्या छाननीतही कलाटे यांचा अर्ज वैध ठरला आहे. सध्या राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार चिंचवडच्या रिंगणात राहणार नाही. त्यामुळे आमदार जगताप यांना घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना पुरस्कृत करण्याची खेळी खेळली जाण्याची चर्चा आहे. तसे झाले, तर आमदार जगताप यांच्यापुढे राहुल कलाटे यांचे तगडे आव्हान उभे राहणार आहे. शिवाय भाजपाच्या उमेदवाराविरोधात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते कलाटे यांना पाठिंबा देणार असल्याचे चर्चा आहे. .........