भाजपा - शिवसेना युतीला ' धडकी ' पुण्याच्या पाण्याची.. आघाडीला 'संधी ' बापटांना घेरण्याची..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 08:00 PM2019-03-29T20:00:14+5:302019-03-29T20:03:16+5:30
पालिका व जलसंपदा यात सातत्याने वाद होत असताना बापट यांनी मार्ग काढण्याऐवजी पुणेकरांनाच पाणी जपून वापरा असा सल्ला देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली.
पुणे : पालकमंत्री म्हणून पुण्याच्या पाण्यावर घेतलेली भूमिका भाजपा शिवसेना युतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांना महाग पडण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बापट यांना पाणी विषयावर त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरून निवडणुकीच्या रिंगणात घेरण्याची चिन्हे आहेत.
पुण्याचा पाणी कोटा वाढवून देण्याचा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे. तो वाढवून मिळत नाही व मिळते आहे ते पाणी पुरत नाही अशी पुण्याची स्थिती आहे. त्यावर पालिका व जलसंपदा यात सातत्याने वाद होत असताना बापट यांनी मार्ग काढण्याऐवजी पुणेकरांनाच पाणी जपून वापरा असा सल्ला देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुणेकरांना जास्त पाणी लागते अशी एकदा नव्हे तर अनेकदा टीका केला. त्याही वेळी पुणेकरांची बाजू घेण्याऐवजी बापट यांनी काहीच भूमिका न घेता मौन बाळगणे पसंत केले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्यावरून त्याचवेळी बापट यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना लक्ष्य केले होते.
त्यानंतरही कालवा समितीच्या बैठकीत पुण्यावर पाण्यासाठी अन्याय होत असताना बापट व भाजपाचेही आमदार शांत बसले. परतीच्या पावसावर भरोसा ठेवून गरज नसताना धरणातील पाणी कालव्यात सोडले गेले त्यालाही बापट यांनी कधी हरकत घेतली नाही, उलट त्यांच्याच संमतीने दौंडचे आमदार राहूल कूल यांच्या मदतीसाठी म्हणून पाणी सोडले जात असल्याचे बोलले जात होते, त्याला बापट यांनी कधीच हरकत घेतली नाही. आता अमदार कूल यांच्या पत्नी कांचन बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार असल्यामुळे बापट त्यावेळी शांत का बसले होते याचा उलगडा होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे.
आता लोकसभेला बापट भाजपाची उमेदवारी करत असताना नेमक्या पाण्याच्याच मुद्द्यावर त्यांना कचाट्यात पकडण्याची आघाडी रणनिती आहे. लोकसंख्येच्या आधारावर पुण्याचा पाणी कोटा जलसंपदाकडून वाढवून घेण्याची मागणी होत असताना त्यावर बापट यांनी काहीच केले नाही. जलसंपदाकडून लोकसंख्येचे पुरावे द्या, आधारकार्ड सादर करा, तरंगत्या लोकसंख्येची निश्चित आकडेवारी द्या असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत पालिकेला त्रासच दिला गेला आहे. तसेच जलसंपदाने तीन वेळा थेट पालिकेच्या पाणी उपसा केंद्रात जाऊन पंप बंद करण्याची कारवाई केली तरीही बापट यांनी त्यावर काहीच केले नाही. पालिकेला थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घ्यावी लागली. हे सर्व मुद्दे प्रचारात उपस्थित करून बापट यांना घेरण्याचा विचार आघाडीत सुरू आहे.