पुणे :महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला जनादेश खरं तर भाजप आणि शिवसेनेला होता. भाजप- शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. एका अर्थाने रक्त हिंदुत्व कॉमन आहे. त्यामुळे युतीबाबत आशावाद नक्की आहे, असे वक्तव्यभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चर्चेसाठी दरवाजे तेव्हाही खुले होते.त्यामुळे असं काही असेल तर स्वागत आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पक्षावरील नाराजीवरही प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, 'पंकजा मुंडे कुठेही जाणार नाहीत. हे माध्यमांनी निर्माण केलेले चित्र आहे. त्या किंवा नाथाभाऊ यांच्यापैकी कोणीच पक्षातून जाणार नाहीत. ही काही काल-परवा पक्षात आलेली नवखी मंडळी नाहीत. पंकजाताई लहान असल्यापासून त्यांनी पक्ष अनुभवला आहे. तसेच नाथाभाऊंनी गोपीनाथ रावांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवला आहे.पक्षाचं नुकसान होईल असं ते काहीही करणार नाहीत. त्यांचं जे काही म्हणणं आहे, ते ऐकलं आहे. आणि त्यावर कार्यवाही नक्की करू असेही त्यांनी स्पष्ट केले.