पुणे : भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन पाच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री द्यावा. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी हा मार्ग अवलंबला पाहिजे. याबाबत भाजपला विनंती करणार आहे. भाजप शिवसेना एकत्र येईल असा प्रस्ताव मांडणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले आहे. पुणे शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले. त्याबरोबरच राज्यपाल, महाविकास आघाडी, अशा विविध मुद्द्यांवर लक्षकेंद्रित केले.
'गो महाविकास आघाडी गो'
'गो कोरोना गो' ही घोषणा जगभर गाजली. आता ओमायक्रॉन आला असला, तरी त्याचा प्रभाव फारसा नाही. त्यामुळे यापुढील काळात माझा नारा 'गो महाविकास आघाडी गो' असा असणार आहे. तीन चाकांचे हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत नाही. दलितांना सुविधा मिळत नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये तरतूद करावी असंही ते म्हणाले आहेत.
गांधींबाबतचे वक्तव्य चुकीचे
''महात्मा गांधींच्या विचारांवर नरेंद्र मोदी सरकार काम करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या बाबतीत साधू-संतांनी अशी टीका-टिपण्णी करणे योग्य नाही. या वक्तव्याबाबत कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी आठवले यांनी केली आहे.''
भीमा कोरेगाव स्तंभाजवळ आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे
''भीमा कोरेगाव स्तंभाजवळील २० हेक्टर जमीन शासनाने जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी. त्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे. पुरातत्व खाते, पर्यटन खात्याच्या वतीने तेथे स्मारक उभे राहावे. अनुयायांना केवळ एक जानेवारीलाच नव्हे, तर कायम येता येईल, दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था उभारावी. ग्रंथालय, संग्रहालय उभारावे. महार बटालियन आणि पोलिसांनीही विजयस्तंभाला मानवंदना द्यावी."