पुणे : पुणे महापालिकेच्या विषय समित्या व प्रभाग समित्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने ठेंगा दाखवल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेलेही लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने लगेच घेतलेल्या या पवित्र्यामुळे धास्तावले आहेत. संपर्क प्रमुखांकडे याविषयी तक्रार करण्याचा निर्णय झाला असून त्याची दखल पक्षप्रमुखांनी घ्यावी असे नगरसेवक तसेच शहर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पक्षप्रमुखांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे खूशीत आलेल्या शिवसैनिकांमध्ये लोकसभेसाठी युती झाल्याने नाराजी निर्माण झाली, मात्र पक्षाचा निर्णय म्हणून सर्वांनीच लोकसभेसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात व त्यातही पुणे लोकसभेत निष्ठापुर्वक भाजपाचे काम केले. त्यानंतर सत्तापदाचे वाटप भाजपाने पालिकेतील सत्तेपासून करावे अशी शिवसेनेची अपेक्षा होती. पालिकेतील भाजपाचे संख्याबळ ९८ आहे. त्यातुलनेत शिवसेनेचे फक्त १० नगरसेवक आहेत. पालिकेची निवडणूक झाल्यापासून शिवसेना भाजपाच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळेच पालिकेच्या सत्तेत शिवसेनेला सामावून घेण्यास पालिकेतील भाजपाचे धुरिण तयार नाहीत.तरीही विषय समित्यांच्या निवडणूकीत आपल्याला शहर सुधारणा व महिला बाल कल्याण या दोन महत्वाच्या समित्या द्याव्यात अशी मागणी शिवसेनेने केली. ती भाजपाने धुडकावून लावली व त्यासाठी यासंदर्भात राज्यस्तरावर धोरण ठरायला हवे अशी भुमिका घेतली. हवे असेल तर दोन समित्यांच्या उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करावेत अशीही सुचना केली. शिवसेनेने त्याला नकार दिला व एकाही समितीसाठी अर्ज दाखल केला नाही. त्यानंतर प्रभाग समित्यांमध्येही हाच प्रकार झाला. तिथेही भाजपाने शिवसेनेले ठेंगा दाखवत बहुसंख्य प्रभाग समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने लगेच घेतलेल्या या धोरणामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे शहर पदाधिकारी धास्तावले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी किमान तीन मतदारसंघ मिळावेत अशी शिवसेनेची इच्छा आहे. मात्र ती फळाला येण्याची शक्यता भाजपाच्या शिवसेनेला पालिकेतील सत्तेपासून दूर ठेवण्याच्या धोरणामुळे धूसर झालेली दिसते आहे. याबाबत काही नगरसेवक संपर्क प्रमुखांकडे तक्रार करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यासाठी शहर पदाधिकाºयांची फूस असून ही तक्रार थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
पुणे महापालिकेमध्ये भाजपा-शिवसेनेत धुसफूस सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:24 PM
पक्षप्रमुखांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे खूशीत आलेल्या शिवसैनिकांमध्ये लोकसभेसाठी युती झाल्याने नाराजी निर्माण झाली,
ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या विषय समित्या व प्रभाग समित्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने दाखवला ठेंगा सत्तापदाचे वाटप भाजपाने पालिकेतील सत्तेपासून करावे अशी होती शिवसेनेची अपेक्षा