Sambhaji Bhide: हिम्मत असेल तर भाजपने संभाजी भिडेंचा तीव्र निषेध करावा; काँग्रेसची मागणी
By राजू इनामदार | Published: June 27, 2023 05:35 PM2023-06-27T17:35:02+5:302023-06-27T17:37:50+5:30
जनमत चाचपण्याचा प्रकार जूनाच...
पुणे : भारताचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रध्वज यांची निर्भत्सना करणाऱ्या संभाजी भिडे यांचा भारतीय जनता पक्षाने हिम्मत असेल तर तीव्र निषेध करावा अशी मागणी काँग्रेसने केली. मुळमुळीत शब्दांमध्ये हे योग्य नाही वगैरे सांगितल्याने भाजपचा बुरखा फाटला आहे असे काँग्रेसने म्हटले आहे.
प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, अखंड हिंदूराष्ट्र व संघाच्या अजेंड्यावर असलेल्या अशाच अनेक वादग्रस्त व भारताच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या विषयांबाबत जनमताची चाचणी करण्याचा भाजप व त्यांच्या मातृसंस्थेचा हा प्रकार जूनाच आहे. यावेळी त्याची हद्द झाली. संभाजी भिडे वाटेल ते बरळले आहे. सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय त्यांना असे धाडस होणे शक्त नाही. तसा पाठिंबा नसेल तर भाजपने मुळमुळीत शब्दांमध्ये न बोलता भिडेवर त्वरित कारवाई करावी, कारण त्यांचे वक्तव्य देशद्रोहातच मोडणारे आहे.
मुस्लिम समाजाचा कायम द्वेष करायचा व पाकिस्तानसह अखंड भारताचा आग्रहही धरायचा ही भूमिकाच विसंगत आहे, मात्र अशा विसंगत भूमिकांसाठीच भाजप प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तर देशाच्या एकतेला, वैविध्यतेला हानी पोहचवणे हा उद्देशच आहे. त्यामुळेच हिंदूराष्ट्र सारख्या घटनाबाह्य संकल्पनेचा ते हट्टाग्रह धरतात, त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवतात, प्रत्यक्षात मात्र फक्त सत्ता मिळवण्यासाठीच त्यांचे सर्वकाही सुरू असते असे तिवारी म्हणाले. भिडे यांच्यावर राज्याच्या गृहखात्याने त्वरित कारवाई करावी, सर्वप्रथम त्यांना ताब्यात घ्यावे, अन्यथा न्यायालयाने स्वत: याची दखल घ्यावी व भिडेंवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत अशी काँग्रेसची मागणी असल्याचे तिवारी यांनी सांगितले.