पुणे महापालिकेतल्या नगरसेवकांनी आज दिवसभरात भाजपच्या इतिहासापासून ते मोदी सत्तेत आल्यापासून पक्षात धोरणांमध्ये झालेल्या बदलापर्यंतचे धडे गिरवले. काही नगरसेवक निवडणुकीच्या आधी पक्ष सोडण्याच्या तयारीत असतानाच घेण्यात आलेल्या ‘कार्यशाळे’च्या माध्यमातून नाराजांची नाराजी दूर करण्याचा भाजपकडून करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीला आता एक वर्ष शिल्लक राहिले आहे. गेल्यावेळी भाजपने निवडणुकीत जवळपास सेंच्युरी मारत एकहाती सत्ता मिळवली होती. गेल्या वर्षी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी भाजप नगरसेवकांनी केली असली तरी कोरोनामुळे या सगळ्या प्रकल्पांसाठी यंदा तरतूद आणि पाठपुरावा करण्याची वेळ भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते यंदा लवकरच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रदेशाध्यक्षच पुण्यात असल्याने यंदा गेल्या निवडणुकांच्या तोडीस तोड कामगिरी करण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. यापूर्वी पुण्यात काही कार्यक्रम घेतले गेले असले तरी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे. त्यातच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. पक्षातले अनेक नगरसेवकही विविध कारणांनी नाराज असल्याच्या पार्श्वभुमीवर नगरसेवकांना एकत्र आणत नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. महापालिकेतील सत्ता राखण्याचं आव्हान; पुण्यात भाजप नगरसेवकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात
उद्घाटनाच्या निमित्तानेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासाची उजळणी केली. हे करतानाच पक्षाची सध्याची ‘कार्यपद्धती’ नगरसेवकांना पुन्हा सांगण्यात आली. त्यापाठोपाठ सुधीर मुनगंटीवारांनी अर्थसंकल्प समजावतानाच मोदींनी त्यात केलेल्या बदलाचे महत्वही नगरसेवकांना समजावले. यापाठोपाठ श्रीकांत भारतीय सोशल मिडियाच्या वापराबाबत ट्रेनिंग दिले.
तब्येतीच्या कारणाने गैरहजर राहिलेले दोन नगरसेवक वगळता बाकी सगळे या कार्यशाळेला पूर्ण वेळ उपस्थित असतील याची दक्षता भाजपनी घेतली आहे. आज प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या नगरसेवकांबरोबरच मुक्कामही केला आहे. शुक्रवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल पाच तास हजेरी लावत मार्गदर्शन करणार आहेत. या सगळ्या प्रयत्नांमध्ये नगरसेवकांना कामावर लक्ष द्यायला आणि जनसंपर्क वाढवण्याची सूचना प्रत्येक नेत्याकडून करण्यात येत असल्याची माहिती एका नगरसेवकाने लोकमतशी बोलताना दिली.