पुणे : कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वानीच जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. चिंचवड मतदारसंघासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. तर, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेंबाची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम पक्ष महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेमंत रासने हे सकाळी साडेनऊ वाजता ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरचे दर्शन घेऊन अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंदकांत पाटील, बाळासाहेंबाची शिवसेनेेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी भाजपच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. ही पोटनिडणुक बिनविरोध व्हावी अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली आहे. तसेच शैलेश टिळक उमेदवारीबाबत नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.