वालचंदनगर: भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने शिक्षण संचालकांना वरिष्ठ व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणाच्या तारखा तत्काळ घोषित करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. मागण्या वेळेत मान्य न झाल्यास राज्यातून शिक्षकांचे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पुणे जिल्हा भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संतोष कदम यांनी दिला आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तत्काळ सुरू करण्यात यावे, एक तारखेला वेतन मिळण्याबाबत व वेतनास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम तत्काळ देय करावी, परिविक्षाधीन सहायक शिक्षक (शिक्षण सेवक) परिविक्षाधीन शिक्षकेतर कर्मचारी (शिक्षकेतर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावे, शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या वेळी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशम कोल्हे, पुणे विभाग भाजप शिक्षक आघाडी अध्यक्ष बबनराव उकिरडे,पुणे विभाग उपाध्यक्ष सुनील मोरे, भाजप शिक्षक आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष कदम,पुणे शहर भाजप शिक्षक आघाडी स्वाती सावंत, सुरेश तिवाटणे यांनी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक सुनंदा वाखारे, प्राथमिक विभागाच्या स्मिता गौड यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या मागण्या सादर केल्या.
भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.
१३०९२०२१-बारामती-०३