पुणे : शिरूर मतदारसंघाची जागा आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटासाठी सोडण्यात येणार आहे, तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे उमेदवार असतील का, हे आताच सांगता येणार नाही. पक्ष त्यावेळी याबाबत योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे शिरूरमधील सर्वच इच्छुकांचे टेन्शन वाढले जाणार आहे.
लोकसभेच्या ज्या १४४ मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत, अशा मतदारसंघात भाजपकडून लोकसभा प्रवास योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात १६, तर पुण्यातील मावळ, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर सिंह यांनी नुकताच शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तीनदिवसीय दौरा पूर्ण केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिरूरच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार योगेश टिळेकर, धनंजय जाधव उपस्थित होते.
सिंह म्हणाल्या, शिरूरचे सध्याचे राष्ट्रवादीचे खासदार नागरिकांना केवळ टीव्ही स्क्रीनवरच दिसत आहेत. ते नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी या मतदारसंघातील नागरिकांनी केल्या आहेत. परिणामी या मतदारसंघात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची यादी तयार केली असून, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सादर करणार आहे.