मंचर : केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपा नेत्यांवर मात्र एक ओळीची कारवाई होत नाही. चांगले काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी करावा. असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
वळसे पाटील म्हणाले, कोरोनामुळे विकास कामाचा निधी तिकडे वळवावा लागला. हक्काचा जीएसटी व इतर कोणतीही मदत केंद्र सरकार करत नाही. मात्र सामान्य माणूस, शेतकरी अडचणीत असताना मदत करण्याची भूमिका घेऊन महाविकास आघाडी सरकारने विकासाचा गाडा सुरू ठेवला आहे. भाजप राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी काहीतरी निमित्त करून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत पक्ष नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रितपणे लढणार आहे.
महाराष्ट्र बंदची हाक तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे दिली
आमची लढाई सर्वसामान्य शेतकरी, कामगार यांच्या हिताच्या विरोधात असणाऱ्यांशी आहे. महाराष्ट्र बंदची हाक तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे दिली आहे. केंद्राच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी जबाबदारी पार पाडावी लागेल .कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जनजागृती करावी असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, राजू बेंडे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी मनोगत व्यक्त केले.