बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ४०० खासदार निवडुन देण्याची भूमिका मांडत होते. देश चालवण्यासाठी २५० ते ३०० खासदार पूरेसे असतात. मात्र, त्यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले संविधान हटवायचे होते. घटनेत बदल करण्यासाठीच त्यांना एवढे खासदार निवडून आणायचे होते, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. मात्र, महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून देऊन मोंदींना महाराष्ट्र काय ‘चीज’ आहे, ते दाखवून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. बारामती येथे महायुतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.
सत्ताधाऱ्यांनी आज राज्यात महिला मुलींसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली. पण त्या सुरक्षित नाहीत, आज तरुणांना शिक्षण घेऊन देखील तरुणांना रोजगार नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली. मग सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात, अशा शब्दात पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजना जाहीर केली. महिला, मुलींचा जरुर सन्मान करा, पण आज राज्यात या बहिणींची काय अवस्था आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले. या अत्याचारीत मुली आणि महिलांची संख्या ६७ हजार ३८१ वर पोहचली आहे. ६४ हजार मुली बेपत्ता आहेत. त्यांच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणती पावले टाकली, याचे उत्तर द्यावे,अशी टीका पवार यांनी केली.
राज्यात शेतीमालाला भाव नाही, शेतीमालाची निर्यातबंदी केली. २० हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांचा काय गुन्हा होता, शेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. देशातील उद्योजकांचे १६ हजार कोटींची केंद्र सरकारने कर्जमाफी केली. मात्र, शेतकऱ्यांवर कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करण्याची वेळ आल्याची टीका पवार यांनी केली. आज राज्यात मुले मुलींनी शिक्षण घेतले. पण त्यांना नोकऱ्या नसल्याने ते निराश आहेत. या निराशेतून मुले टोकाचे पाऊल उचलण्याची भीती यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली.
बारामतीकरांमुळे मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी सुरु करुन मोठे उद्योग आणले. हजारो हातांना काम दिले. मात्र, आज सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ते केवळ गुजरातचे नाहीत. देशाचा विचार न करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची का, याचा विचार करा, असा टोला पवार यांनी लगावला.
बारामती येथील सांगता सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी घेतलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘जिकडे म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय, अशा आशयाचा तो फलक होता. याशिवाय ‘कराल काय नाद परत, बापमाणुस अशा शरद पवार यांचे वर्णन करणाऱ्या फलकांनी सभेत अनेकांचे लक्ष वेधले.