पुणेः 2014 च्या लाेकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने साेशल मीडियाचा माेठ्याप्रमाणावर वापर केला हाेता. साेशल मीडियावर चालविलेल्या कॅम्पेनमुळे भाजपाला घवघवीत यश मिळाले. विधानसभेला देखील साेशल मीडियावरील प्रचाराचा भाजपाला फायदा झाला. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा भाजपाची वाॅर रुम सज्ज झाली असून साेशल मीडियाच्या माध्यामातून मतदारांपर्यंत पाेहचण्याच भाजपाचा प्रयत्न आहे.
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपाची वाॅर रुम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पुणे शहरातील वॉर रूम प्रदेश आणि केंद्रीय वॉर रूमला संलग्न असेल.पक्षाच्या शहरातील मुख्यालयातून या वॉर रूमचे काम चालणार आहे. शहरावरील टीम तसेच प्रत्येक विधानभा मतदारसंघासाठी एक प्रभारी असेल. त्याच्या मदतीसाठी तेथे दहा जणांची टीम असेल. शहरात सुमारे १०० युवकांची टीम सोशल मीडियावर पक्षाची टिम काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत मतदारांपर्यंत पोचविलेल्या योजनांची माहिती मतदारांना देतानाच तिहेरी तलाक रद्द करणे, कलम ३७० रद्द करणे, चांद्रयान, सार्वजनिक स्वच्छता, मेट्रो आदींबाबत घेतलेल्या प्रमुख निर्णयांचीही माहितीही मतदारांपर्यंत पोचविण्यात येणार आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.
फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदींच्या माध्यमातून भाजप मतदारांपर्यंत पोचणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय व्हॉटसअपचे ग्रूपही कार्यान्वित करण्यात आले आहेत. पर्वती, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी, आणि कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आठही आमदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत कोणती विकास कामे केली आहेत, याचीही माहिती मतदारांना मिळणार आहे. पीएमआरडीएचा विकास आराखडा, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण, नव्या ई-बस, मेट्रोचे विस्तारीकरण, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठीच्या नियमावलीतील सुधारणा आदींचा त्यात समावेश आहे. सोशल मीडियावर मतदारांच्या मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या सूचना भाजपच्या वॉररूमध्ये नोंदविण्यात येणार आहेत.