भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनाच मंत्रीपदे देणारे भाजप वॉशिंग मशीन; पुण्यात काँग्रेसचे आंदोलन
By राजू इनामदार | Published: July 10, 2023 03:21 PM2023-07-10T15:21:57+5:302023-07-10T15:26:50+5:30
भाजपने नारायण राणे यांच्यापासून ते आता अजित पवार यांच्यापर्यंत शेकडो जणांना याच पद्धतीने त्यांनी स्वच्छ केले
पुणे : ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर करून नंतर त्यांनाच पक्षात घेऊन मंत्रीपदे देणाऱ्या भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप वॉशिंग मशिन आहे. तसेच धुलाई पावडर आहे. कारण भ्रष्टाचारी लोक त्यांच्यात गेले की पावन होतात असा आरोप करत काँग्रेसच्या शहर शाखेने सोमवारी सकाळी आंदोलन केले. भाजपच्या शहर कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे तसेच प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत सुरसे, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, महिला आघाडी अध्यक्ष पूजा आनंद, युवक काँग्रेसचे प्रथमेश अबनवे नरुद्दीन सोमजी, अविनाश बागवे व अन्य पदाधिकारी आंदोलनाला उपस्थित होते.
भाजपच्या शहर कार्यालयासमोरच्या रस्त्यावर आंदोलकांनी वॉशिंग मशिनची प्रतिकृतीच आणली होती. त्यावर भाजप वॉशिंग मशिन असे ठळक अक्षरात लिहिले होते. त्यात मोहन जोशी यांनी भ्रष्टाचार असे लिहिलेले काळा टी-शर्ट टाकला. त्यात भाजप वॉशिंग पावडर टाकली व थोड्या वेळाने त्यातून पांढरा शुभ्र टी-शर्ट काढलून दाखवला.
जोशी म्हणाले, “सध्या देशभर हाच उद्योग चालला आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव टाकायचा. आरोप करायचे, ईडीची नोटीस पाठवायची व नंतर त्याच लोकांना भाजपत घ्यायचे किंवा सत्तेला त्यांचा पाठिंबा घ्यायचा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापासून ते आता अजित पवार यांच्यापर्यंत शेकडो जणांना याच पद्धतीने त्यांनी स्वच्छ केले आहे.” काँग्रेस अशा भ्रष्ट राजकारणाच्या कायम विरोधातच आहे, संतमहंतांच्या महाराष्ट्र भूमीत या प्रकारचे राजकारण चालणार नाही हे मतदार त्यांना दाखवून देतील असा इशारा जोशी यांनी दिला. आमदार धंगेकर यांनीही यावेळी भाजपवर टीका केली. राज्यातील मतदार भाजपच्या या राजकारणाला थारा देणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप कार्यालयाच्या समोर उभे राहून यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.