पुणे : देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस फोडायला त्यांना १० वेळा जन्म घ्यावे लागलीत. तरीही काही होणार नाही, असा विश्वास माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. पावसाने कहर केला आहे व सरकारचे अस्तित्व कुठेही दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी सकाळी एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांबरोबर संवाद साधताना मुंडे म्हणाले की, परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. शेतातून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले होते त्याला जागेवरच कोंब फुटत आहेत. फक्त सोयाबीनच नाही तर पावसाने शेतकऱ्यांना हाताला कुठलेच पीक लागू दिलेले नाही. असे असताना कुठेही पंचनामे झालेले नाहीत. नुकसानभरपाईच्या फक्त गप्पा केल्या जात आहेत, प्रत्यक्षात काहीच व्हायला तयार नाही. या सरकारचे अस्तित्वच आता तीन महिने होऊन गेले तरीही दिसत नाही.
याचे कारण यांचे मंत्रीमंडळच वेळेवर तयार झाले नाही, ते झाले तर मग नंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यातच झाल्या नाहीत. या कालावधीत कोणाचेही कोणाच्याच कामांवर नियंत्रण नव्हते. त्याचा परिणाम म्हणून पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाहीत. नियम, अटी यांच्यात शेतकऱ्यांना अडकवले जात आहे. या काळात कृषीमंत्री आहेत तरी कुठे, असा प्रश्न मुंडे यांनी केला. हे सरकार जनतेच्या नाही तर स्वत:च्या हितासाठी तयार झालेले सरकार आहे. १०० रुपयांमध्ये शिधा हा तर केवळ फसवा प्रकार असून तो प्रत्यक्षात येणार नाही, असे मुंडे म्हणाले.