पुणे: नरेंद्र मोदींच्या (pm narendra modi) विरोधात कुणीही एकत्र आले तरी सर्वसामान्य माणसांनी काय करायचं ते ठरवलं आहे. 44 कोटी जनधन बँकेची खाती उघडल्यानंतर, 7 कोटी घरात शौचालय झाल्यानंतर, 3 कोटी लोकांना घर मोफत मिळाल्यानंतर आणि आता 70 हजार कोटींची 'हर घर पाणी' योजना आल्यानंतर अनेक महिलांच्या डोक्यावरचा हंडा जाणार आहे. प्रत्येक घरी, गावागावात नळाने पाणी येणार आहे. हे सर्व झाल्यानंतर लोकं मोदींनाच मतदान करणार आहेत, असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, भारत देशात लोकशाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एकत्र येऊन वातावरण निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झालाच तर काय होईल माहीत नाही. पण आजची स्थिती ही आहे की भारतीय जनता पक्ष 418 जागांच्या खाली येणार नाही, असा एक अहवाल समोर आला आहे. वेगवेगळ्या एजन्सीजने केलेला हा सर्वे आहे, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.