लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बलात्काराचे आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वत: राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो मागितला पाहिजे. परंतु, पवारांनी प्रकरण गंभीर असल्याचे सांगितल्यानंतर पोलीस चौकशी करतील, असा घूमजावही केला. पवारांकडून ही भूमिका अपेक्षित नव्हती. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून (दि. १८) भाजपाच्या महिला आघाडीकडून राज्यभर तहसीलदार कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
रेणू शर्मा प्रकरणावरून पाटील यांनी शनिवारी (दि. १६) पत्रकार परिषद घेत भाजपाची भूमिका स्पष्ट केली. रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर त्यांच्यावरही अनेकांनी आपल्याला ‘ब्लॅकमेल’ करीत असल्याचा आरोप केला. त्या खऱ्या की खोट्या याची चौकशी व्हायलाच हवी. परंतु, धनंजय मुंडे यांनी कबुली दिलेल्या ‘करुणा शर्मा’ प्रकरणाचीही चौकशी व्हायला हवी. याविषयी बोलायला कोणीही तयार नाही. करुणा शर्मा यांच्यासोबतच्या शरीरसंबंधांसह त्यांच्या दोन अपत्यांची माहिती मुंडे यांनी स्वत:च जाहीर केलेली आहे.
मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वत: राजीनामा द्यावा. ते पदावर राहिलेल्या निष्पक्ष चौकशी होणार नाही. अन्यथा पक्षाच्या अन्य नेत्यांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले पाहिजे. आजवरच्या राजकीय इतिहास अशा प्रकारच्या आरोपांनंतर राजीनामा देण्याच्याच घटना आहेत. मुंडे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातही मुलांची माहिती लपविलेली आहे. त्यामुळे अनेकजण निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयात गेल्याचे पाटील म्हणाले.
चौकट
पन्नास वर्षांत घडले नाही
शरद पवारांनी ५० वर्षांच्या राजकीय जीवनात अशा प्रकारचे आरोप झालेल्यांना पाठीशी घातलेले नाही. हे प्रकरण गंभीर असल्याचे त्यांनी म्हटल्यानंतर कारवाईच्या अनुषंगाने सकारात्मक दिशा मिळाली होती. परंतु, त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूमिका बदलली. पोलीस चौकशी करतील, त्यातून काय निष्पन्न होते ते पाहू असे त्यांनी म्हटले आहे. पवारांनी अशा प्रकारे पाठराखण करणे अयोग्य असून त्यांच्याकडून नैतिकतेची चाड अपेक्षित असल्याचे पाटील म्हणाले.
चौकट
मंत्र्यांवर बलात्कार, मारहाणीचे आरोप
“मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरातील तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन केले जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने निवेदन देण्यात येणार आहे. मंत्र्यांवर होणारे बलात्काराचे आरोप, मारहाणीचे आरोप असे अनेक आरोप असलेल्यांना सोबत घेऊन ठाकरे सरकार चालविणार का,” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.