पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघ येत्या लोकसभा निवडणुकीत जिंकण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने आराखडा तयार केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा तीन दिवसांचा दौरा त्यासाठीच आहे. आता तिथे कमळ फुलवणारच असा निर्धार माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला.
अमेठीसारखा लोकसभा मतदार संघ, ज्याने देशाला इतके पंतप्रधान दिले, तो मतदारसंघही भाजपने काबीज केला. त्यासमोर बारामती लोकसभा मतदार संघ काहीच नाही, असे शिंदे म्हणाले. पक्षाने मागील लोकसभा निवडणूकीत दुसऱ्या क्रमाकांवर असलेले देशातील १४४ मतदार संघ केंद्रीय मंत्र्यांना दिले आहेत. त्यात राज्यातील १६ आहेत. त्यातील २ पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापैकी बारामतीला लक्ष्य करण्यात आले आहे.
मागील वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमच्यासमवेत नव्हते. यावेळी ते आमच्याबरोबर आहेत याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. त्यांची लाखभर मते आमच्याकडे असली असती तर मागच्या वेळीच जिंकलो असतो असे ते म्हणाले.
हा पवारांचा बालेकिल्ला वगैरे समजले जाते, पण तसे नसते हे आम्ही अमेठीत दाखवून दिले. बारामतीत सन २०१४ ला ६८ हजार मतांनी हरलो. सन २०१९ ला दीड लाख मतांंनी हरलो पण आमची मते ८० हजारांनी वाढली. आता यावेळी आम्ही १८ महिने आधी काम सूरू केले आहे. निर्मला सितारामन यांचे २१ कार्यक्रम ३, दिवसांत वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघात होतील अशी माहिती शिंदे यांनी दिली. पक्षाचे राज्यातील निवडणूक विभाग प्रमूख सूनील कर्जतकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व अन्य पदाधिकारी यावेळी ऊपस्थित होते.