भाजपला देशातील जनतेची नसच सापडली नसल्याने कायदे मागे घेतले; पुण्यातून काँग्रेसची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 03:45 PM2021-11-19T15:45:51+5:302021-11-19T16:08:33+5:30
कृषी कायदे रद्द केल्याचा जल्लोष करत आंदोलनात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
पुणे: संसदेत या कायद्यांना सर्वप्रथम काँग्रेसनेच विरोध केला. केंद्रातील भारतीय जनता पक्षच्या सरकारला या देशातील जनतेची नस सापडलेली नाही. हेच त्यांच्या कायदे मागे घेण्याच्या निर्णयावरून सिद्ध झाले असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले. काँग्रेस भवनच्या आवारात फटाके फोडून केंद्र सरकारच्या या माघारीचा जल्लोष व आंदोलन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
बागवे म्हणाले, काँग्रेस नेहमीच देशातील सर्व स्तरामधील जनतेला बरोबर घेऊन काम करत असते. जनतेचे काय म्हणणे आहे ते ऐकणे, त्याचा आदर करणे कोणत्याही सरकारचे कामच आहे. त्याऐवजी केंद्र सरकार दडपशाहीने त्यांचे म्हणणे शेतकऱ्यांवर लादत होते.
''सरकारने आंदोलन शेतकऱ्यांचा अंत पाहिला. वर्षभऱ् दुर्लक्ष केले. त्यात अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले, तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. आताही पंजाब, उत्तरप्रदेश निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय झाला आहे, पण उशीरा व कोणत्याही कारणाने का होईना त्यांनी शहाणपण दाखवले हे महत्वाचे असेे पदाधिकारी म्हणाले.''
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, गटनेते आबा बागूल कमल व्यवहारे, संजय बालगुडे, रफिक शेख, लता राजगुरू, नीता रजपूत, दत्ता बहिरट, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे व पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आंदोलनात मरण पावलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.