विवेक हरवलेल्या फॅसिस्ट कार्यकर्त्यांचे 'युवा मोर्चा' आश्रयस्थान; खासदार बापट यांना काँग्रेसचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:48 AM2022-11-24T09:48:10+5:302022-11-24T09:48:26+5:30
शहरातील राजकारणाचा खालावलेला स्तर ठीक करण्याची जबाबदारी शहरातील ज्येष्ठ राजकारणी म्हणून तुमचीच आहे, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे...
पुणे :काँग्रेस भवनवर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी खासदार गिरीश बापट यांनी पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी विवेक हरवलेल्या फॅसिस्ट विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचे युवा मोर्चा हे प्रमुख आश्रयस्थान असल्याची थेट टीका केली आहे. शहरातील राजकारणाचा खालावलेला स्तर ठीक करण्याची जबाबदारी शहरातील ज्येष्ठ राजकारणी म्हणून तुमचीच आहे, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यावरून १८ नोव्हेंबरला भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनवर हल्ला केला. त्यात आवारात घुसून मैदानातील गाडीवर लावलेल्या राहुल यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी जाहीर मागणी काँग्रेसने केली आहे. शिवाय पोलिस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील हेडमास्तर म्हणून राजकीय विश्वात वाढलेली ही विषवल्ली मुळापासून उखडण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा. शहर हितासाठी अनेकदा स्वपक्षीयांची कानउघाडणी करताना मी स्वत: तुम्हाला पाहत आलो आहे, त्यामुळे याहीवेळी तुम्ही कष्टाशिवाय प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या, विवेक हरवलेल्या, फॅसिस्ट विचारांच्या कार्यकर्त्यांना कान पकडून जाब विचाराल, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.