पुणे : विधानसभेच्या २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आणण्यासाठी येथून पुढचा प्रत्येक दिवस अहोरात्र कष्ट करणार असल्याचा संकल्प भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मंगळवारी वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे. भाजपाचे महाराष्ट्रात १७५ ते १८५ आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असेही ते म्हणाले.खासदार काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच राज्यातील अनेक भागातील राजकीय, उद्योग, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात हजेरी लावली होती. भाजपासह सर्वच पक्षातील नगरसेवक व इतक नेत्यांनीही शुभेच्छा दिल्या.वाढदिवसाच्या संकल्पाबाबत काकडे म्हणाले ‘‘ केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अनेक लोकोपयोगी कामे केली आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी उत्तम आहे. पुढच्यावेळी भाजपाचे सरकार बहुमतात येण्यासाठी आम्ही सर्वच काम करणार आहोत. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन बेरजेचे राजकारण केले जाईल. महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता येण्यासाठीच यापुढच्या काळातल्या मी अहोरात्र झटणार आहे.’’पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी पारदर्शक कारभाराचा वस्तुपाठ घालून दिला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या योजनांचा चांगला परिणाम दिसत असून, त्या घराघरांत पोहोचविण्यासाठी आम्ही काम करणार, असेही ते म्हणाले.
भाजपाचे १७५ ते १८५ आमदार निवडून आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 6:36 AM