योगेश टिळेकर : एकही दुकान चालू देणार नाही
कात्रज:
कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर भागात काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू दुकान सुरू झाले आहे. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झालेला असताना आता त्याच्या शेजारी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जय गणेशविश्व सोसायटीच्या दुकानांमध्ये देशी दारूचे दुकान सुरू झाले. या दोन्ही दुकानांच्या विरोधात रविवारी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या दारू दुकानामुळे येथील महिला-भगिनीसह नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळेच येथील नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. या वेळी देशी दारू दुकान बंद झालेच पाहिजे, दारू दुकानाला परवानगी देणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो, गोकुळनगर आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणा देत नागरिकांनी या दुकानाला विरोध केला. याच इमारतीमध्ये देशी दारू, लॉटरी, बीअर बार अशी दुकाने उघडली आहेत, ती दुकाने बंद व्हावीत यासाठी आज हे आंदोलन झाले.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत शिवशंभोनगर गल्ली २ येथे देखील वाइन शॉप सुरू झाले आहे. त्या ठिकाणी देखील तळीराम दारू विकत घेऊन त्याच ठिकाणी पीत बसतात. स्थानिक नागरिक व तळीराम यांच्यात अनेकदा वाद देखील झाले आहेत.
----------------------------
कात्रज कोंढवा रोड येथील गोकुळनगरमधील जयगणेश विश्व सोसायटीत देशी दारूचे दुकान सुरू झाले. आज येथील नागरिकानी दुकान बंद करण्यसाठी आंदोलन करण्यात आले. मी मागील ६ वर्षे या भागात दारू दुकान सुरू होऊ दिले नाही. मी आमदार असताना ही दुकाने होऊ नयेत यासाठी संघर्ष झाला. पण या सरकारने आम्हाला कुठल्या प्रकारची विकासकामे तर दिली नाही, पण दोन दारूची दुकाने मात्र दिली. याचा मी निषेध करतो.
-योगेश टिळेकर, माजी आमदार
-----------------
फोटो:-गोकुळनगर येथे देशी दारू दुकानासमोर आंदोलन करताना महिला व नागरिक.