पुणे : दोन दिवसांपूर्वी केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. त्यानंतर राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली होती. यामुळे पेट्रोल अजून दोन रुपयांनी स्वस्त होणार होते. पण राज्य सरकारने केलेली घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणली गेली नाही. त्यामुळे भाजपने पुण्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून गुडलक चौकात आंदोलन सुरू केले आहे.
'राज्य सरकारनेही दर कमी करण्याची घोषणा केली होती. पण ती घोषणा अंमलात आणली नाही. राज्य सरकारची घोषणा ही फसवी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्य सरकारने ६ ते ७ रुपयांनी कमी करावेत. जोपर्यंत राज्य सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार', असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पार केली होती. पेट्रोलचे दर हे १२० रुपयांवर गेले होते. वाढती महागाई आणि वाढत्या इंधनाच्या दरामुळे सामान्य माणूस मेटाकुटीस आला होता. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने सामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु अजून पेट्रोलचे दर १०० रुपयांपेक्षा जास्तच आहेत.