पुणे : महापालिकेच्या मालकीच्या सर्व ‘ॲमेनिटी स्पेस’ भांडवलदार, गुंतवणूकदार व उद्योजकांना दीर्घ मुदतीच्या कराराने देण्याचा अर्थातच विक्रीचाच दृष्टिकोन ठेवून धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत मान्य करून घेतला. पुणेकरांच्या सोयीसाठी असलेल्या या ॲमेनिटी स्पेसवर डल्ला मारण्याच्या भाजपच्या या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेसने कडाडून विरोध केला. मात्र, भाजपने बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करून घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
गेल्या साडेचार वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने महापालिकेत मनमानी कारभार सुरू केला असून, त्याचेच आणखी एक उदाहरण बुधवारी स्थायी समितीत पाहण्यास मिळाल्याचे जगताप म्हणाले. त्यांनी सांगितले की, काहींचे हितसंबंध जपण्यासाठीच हा ठराव मान्य करण्यात आला. भाजपच्या या निर्णयाबाबत राज्य सरकारकडे तक्रार करणार असून याविरोधात न्यायालयातही दाद मागणार आहोत.