पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 12:04 PM2021-06-18T12:04:22+5:302021-06-18T12:04:30+5:30
भारतीय जनता पार्टीची एक छत्री दुरूस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या टवाळीची भरपाई केली
पुणे: काँग्रेस भवनमध्ये शहर काँग्रेसने सुरू केलेल्या विनामूल्य छत्री दुरूस्ती ऊपक्रमावरून बरीच राजकीय चेष्टा झाली. पण या केंद्रात आज भारतीय जनता पार्टीची एक छत्री दुरूस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या टवाळीची भरपाई केली.
काँग्रेसच्या विनामूल्य छत्री दुरूस्तीची समाजमाध्यमांवर बरीच टर ऊडवली गेली. ७० वर्षांच्या कारभारानंतर आलेली वेळ, आता भाजपाची काही धडगत नाही अशा आशयाच्या पोस्ट केल्या गेल्या. त्यात अर्थातच भाजप समर्थक आघाडीवर होते.
पण आज या केंद्रात एका नागरिकाने चक्क भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली एक छत्री आणून दिली. तिची रंगसंगती भाजपाच्या झेंड्याप्रमाणे आहे. त्यावर कमळाचे चिन्हही आहे. नाईक नावाच्या शनिवारपेठेतील एका आजोबांनी ती आणून दिली व दुरूस्त करून मागितली. छत्री दुरूस्त करणारे रोहिदास कांबळे यांनी सांगितले की तिच्या काड्या तुटल्यात. कापड साधे असल्याने विरले आहे. बहुधा ती वाटपातील असावी. मी ती दुरूस्त करून देणार आहे. काँग्रेसचे सोशल मिडिया आघाडीचे चैतन्य पुरंदरे यांनी हा क्षण बरोबर आपल्या मोबाईलमध्ये टिपला.