पुणे : एक नेता म्हणून सत्यजीत तांबेंचे काम चांगले आहे. परंतू जे काही राजकीय निर्णय आहेत ते योग्य वेळी धोरणांप्रमाणे करावे लागतात. नाशिक पदवीधर निवडणुकीबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पुण्यात बोलताना म्हणाले, त्या जागेवर भाजप उमेदवार देणार होता. त्याबद्दल आम्ही राजेंद्र विखे पाटलांना ती उमेदवारी घ्यावी अशी मागणी केली परंतू त्यास विखेंनी नकार दिला.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज केला आहे. भाजपने या निवडणुकीद्वारे बाळासाहेब थोरातांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. तर इकडे फडणवीसांनी या निवडणुकीबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. सध्या जो घटनाक्रम तुम्हाला वाटतोय तसा नाहीये, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
पंकजा मुंडे शिवसेनेत (ठाकरे गट) जाणार?
पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे त्याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, मातोश्रीचे दार त्यांच्यासाठी जरी उघडे असले तरी पंकजा मुंडे भाजप कधीच सोडणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हेच त्यांचे घर आहे. त्यामुंळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत.
कोयता गँगवर काय म्हणाले फडणवीस?
कोयतागँगवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. अजूनही अधूनमधून कोयता गँगच्या बातम्या येत असतात. अशाप्रकारचे गुन्हे ठेचूनच काढले पाहिजे. आगामी काळात अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्यांवर वेगळ्या प्रकारे कारवाई होताना दिसेल. दहशत कोयता गँगची नाही तर पोलिसांचीच असली पाहिजे. पोलिसांची दहशत लोकांवर, दुकानदारांवर नाही तर गुन्हेगारांवर असली पाहिजे त्यासाठी योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी येत्या काळात आणखी काही उपाययोजना केलेल्या असतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.