पुणे : राज्याच्या गृह खात्याची अवस्था म्हणजे आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खातंय अशी झाली आहे. महाविकास आघाडीतील सत्ताधारी तीन पक्ष केवळ एकमेकांची पाठ थोपण्यात मग्न असल्याचा घणाघाती टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.
पुण्यात चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. वाघ म्हणाल्या, लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेच्या तक्रारीस माजी मंत्री संजय राठोड यांनी टीआरपी न्यूजसाठी असे आरोप केले जात असल्याचे सांगून सत्तेचा माजच दाखविला आहे. मात्र, या प्रकरणात सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत भाजप सर्वस्तरावर लढा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्य सरकार जरी मुर्दाड असले तरी आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केली आहे असेही वाघ यावेळी म्हणाल्या.
यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षकांशी माझे बोलणे झाले असल्याचे सांगून संबंधित पीडित महिलेचे राठोड यांच्याविरोधात तक्रारपत्र आल्याचे त्यांनीही सांगितले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २४ तासांच्या आत यावर कार्यवाही होणे अपेक्षित असताना, या पत्राची अद्यापही दखल घेतली गेलेली नाही.
आज महिलांवरील अत्याचाराची महाराष्ट्रात दखल घेतली जात नाही़ सर्व सामान्य महिलांसह आता पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांनाही लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणातील फॉरेसिक रिपोर्ट पुढे का आणला नाही, त्यात काय झालं, साधी एफआयआरही अद्याप का दाखल झाली नाही असे प्रश्न करत गृहमंत्र्यांनी याबाबतीत लक्ष घालून लागलीच कारवाई केली पाहिजे अशी मागणी वाघ यांनी यावेळी केली.
-----------------संजय राठोड विरोधातच असे आरोप का ? माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्यावरच महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप का होतात असे असतानाही राठोड यांच्यावर राज्य सरकारकडून कारवाई केली जात नाही. यामुळे आगामी रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्रातील माता भगिनींच्या वतीने मुख्यमंत्र्यांना राखी पाठवून आमची सुरक्षा करा म्हणून विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. -----------------------