पुणे : कसब्यात तब्बल ४० वर्षे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. ते या पोटनिवडणुकीत कमी करणारच, असा निर्धार काँग्रेस भवनमध्ये सोमवारी रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तिन्ही पक्षांचे प्रमुख, तसेच आघाडीत असलेल्या अन्य संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह काँग्रेसचेपुणे जिल्हा निरीक्षक आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. व्यवस्थित नियोजन केले, मतदारांशी थेट संपर्क केला, त्यांना आघाडीच्या धोरणांविषयी, भाजपकडून सत्ताकाळात झालेल्या सत्तेच्या बेलगाम वापराविषयी सांगितले, तर विजय नक्की मिळेल, असा विश्वास बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कोपरा सभा व प्रचाराशी संबंधित अन्य कामांसाठीही समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामध्ये सर्वांना स्थान देण्यात आले. समन्वय समितीचे पदाधिकारी दररोज रात्री काँग्रेस भवनमध्ये जमतील, त्यात दुसऱ्या दिवशीचे नियोजन करण्यात येईल. त्याप्रमाणे संबंधित समित्या, तिन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांना भागात निरोप देण्यात येतील व त्याप्रमाणे प्रचार होईल, असे ठरविण्यात आले.
महाविकास आघाडीच्या प्रचाराला विरोधी पक्षनेते अजित पवार, तसेच काँग्रेस, शिवसेनेच्या अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तांबडी जोगेश्वरी मंदिरात पूजा करून सुरुवात करण्यात येणार आहे. त्याची वेळ निश्चित करण्यात येईल. प्रचारासाठी तिन्ही पक्षांचे राज्यस्तरावरील कोणते नेते येऊ शकतील, त्यांचे नावे तयार केली जात आहेत. त्यांच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या प्रचार सभा मतदारसंघात आयोजित करण्यात येणार आहेत.