भाजपचे या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे प्रयत्न महाराष्ट्रात अयशस्वीच
By नितीन चौधरी | Published: February 12, 2024 06:45 PM2024-02-12T18:45:36+5:302024-02-12T18:46:20+5:30
भाजपच्या पायाखालची वाळू सरककल्याने राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे - प्रकाश आंबेडकर
पुणे: काँग्रेसचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहे अशीही चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेप्रकरनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे भाजपला आपण सुरक्षित होऊ असे वाटत असेल तर परिस्थिती कठीण दिसत आहे. कोणताही नेता कोणत्याही पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर फार फरक पडत नाही. पक्ष म्हणून कायम राहतो. एखादा दुसरा जाणे हे धक्कादायक आहे. पण त्यामुळे काँग्रेसवर फार परिणाम होईल असे वाटत नाही,’ असे मत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे सुनावणीसाठी आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने काय होईल याबाबत ते म्हणाले, निवडणूक जशा जवळ येतात तसे राजकारण घडत राहील. भाजपाने या नेत्याला घ्या, त्या नेत्या घ्या. हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे कितीही प्रयत्न केले तरी भाजप महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही. पायाखालील वाळू सरककल्याने भाजप राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, ‘मतदारावर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही. ६० ते ७० टक्के मतदारांनी आपले मत कोणाला द्यायचे हे पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना जे हवय ते होईल असे वाटते. राज्यातील नागरिकांची मानसिकता बदलली आहे. मी अनेक दौरे केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा कधीही वादग्रस्त नव्हता अशी नागरिकांची मानसिकता समोर आली आहे. या काळात पक्ष फोडणे, गोळीबार करणे, संपविणे हे फार मोठ्या प्रमाणात चालले आहे. जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारे नाही. तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तो निवडणुकीची वाट पाहत आहे.’
‘मोदी हे रिंगमास्टर आहेत. काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षातील चौकशीत अडकलेले नेते असतील त्यांना ते नाचवित आहेत. देशात ४५० अराजकीय व्यक्तीवर धाडी घालण्यात आल्या आहेत. भाजपाच्या पायाखालील वाळू सरकली आहे. आम्ही चारशेच्या पुढे जाऊ असे ते कितीही म्हणत असतील तर ते एका भीतीपोटी आहे. भीती निर्माण करण्यासाठी राजकीय तसेच अराजकीय व्यापारी, मत नोंदवू शकणाऱ्या व्यक्तींवरही ते धाडी घालत आहेत,’ अशा शब्दांत आंबेडकर यांनी भाजपला लक्ष्य केले.
महाविकास आघाडीत चर्चा कोणाशी झाली का याबाबत विचारता ते म्हणाले, ‘माझे अद्याप कोणाशीही बोलणे झाले नाही. जागा वाटपाचा आराखडा तयार करू आणि नंतर बोलणी करू असे ठरले आहे. गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चांगली चर्चा झाली आहे. त्यांचे काय ठरले हे अद्याप कळले नाही. एकूण परिस्थिती पाहता जागा वाटप हे आयाराम गयाराम होण्याची शक्यता आहे. ते गयाराम गेल्यावर चर्चेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.’