पुणे : पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तर शिक्षण समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या मंजुश्री संदीप खर्डेकर तर उपाध्यक्षपदासाठी कालिंदा मुरलीधर पुंडे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने माघार न घेतल्याने भाजपच्या निवडणूक बिनविरोध करण्याच्या खेळीला यश आले नाही.
पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीमधील स्थायी समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ऐनवेळी माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र तसे काही झाले नाही. यात भाजपच्या खर्डेकर यांना ८ तर विरोधकांना ४ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष जगताप यांना मतदान करता आले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड व शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केले होते. तर शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला होता.
पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र लढत आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये आलेले आयाराम पुन्हा गयाराम होण्याची चर्चा असल्याने भाजप धोका पत्करू इच्छित नाही. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने बजावलेल्या 'व्हिप'ची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
सोमवारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्याकडे सोमवारी भाजपच्या मंजुश्री खर्डेकर आणि कालिंदा पुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले आहेत.
तिसऱ्यांदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या माळ गळ्यात पडलेले रासने यावेळी म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्दयांवर विरोधकांना ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.मात्र, त्यात यश आले नाही.
पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवत सलग तिसऱ्यांदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे. महापालिकेच्या इतिहासात अशी संधी फक्त मला मिळाली आहे. विरोधकांना विकासाच्या मुद्दयांवर ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. मात्र त्यात यश आले नाही. पण येणाऱ्या वर्षात महापालिकेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.- हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष.