पुणे : महापालिका निवडणुकांना एक वर्ष राहिलेले असताना आता भाजपने आता आपली कामे लोकांपर्यंत पोहोचवायला शहरात थेट होर्डिंग लावण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या होर्डिंगच्या माध्यमातुन लोकांपर्यंत कामे पोहोचवण्यात येणार आहेत. गमतीचा भाग म्हणजे हे कॅम्पेन थेट केंद्रातुन राबवले जात असल्याने शहर पदाधिकारी मात्र आपल्याला काहीच पत्ता नसल्याचा दावा करत आहेत.
पुणे शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये सध्या मोठे होर्डिंग लावलेले दिसत आहेत. ‘विकसित होत आहे आपलं पुणे. दृढ होतो आहे विकास कामांवरील विश्वास ‘ असा संदेश आणि भाजपचे चिन्ह लावलेले दिसत आहे.
शहरातल्या वेगवेगळ्या भागांत लागलेले हे होर्डिंग म्हणजे भाजपच्या निवडणुकीच्या तयारीचाच भाग आहे. पुढचे वर्षभर असेच होर्डिंग्ज शहरभरात लावले जाणार आहेत. त्या माध्यमातुन लोकांपर्यंत पाच वर्षातली कामे पोहोचवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. अर्थात भाजपने जाहीरनाम्यात मांडलेले अनेक प्रकल्प अजुनही अपूर्ण आहेत. त्यामुळे या जहिरातींच्या माध्यमातुनच पुन्हा इमेज बिल्डींगचा भाजप प्रयत्न करतंय का अशी चर्चा पुण्यात रंगली आहे. या मोहिमेचा कंटेंट मात्र भाजप थेट केंद्रीय पातळीवरून ठरवत आहे. त्यामुळे शहरातील काही लोक सोडले तर इतर पदाधिकाऱ्यांना मात्र याचा काहीच पत्ता नाही.
याबाबत विचारले असता पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर म्हणाले ,” आम्ही हैदराबाद सारख्याच ताकदीने मुंबई,पुणे महापालिकेची निवडणुक लढणार आहोत. त्याचाच भाग म्हणून ही मोहीम राबवली जात आहे”