पुणे : संसदेच्या अधिवेशनात सहापैकी पाच विधेयके संमत झाली; मात्र भाजपच्या उद्दामपणामुळेच जमीन अधिग्रहण कायद्याचे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. विरोधक म्हणजे काही सरकारचे नोकर नाहीत. मालक असल्यासारखे त्यांच्याशी वागण्याऐवजी मैत्रीचा हात पुढे करायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ उद्योगपती राहुलकुमार बजाज यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब आॅफ पुणे टिळक रोड आणि पूना मिडटाऊन या संस्थेने आयोजित केलेल्या व्ही. के. ऊर्फ अप्पासाहेब सावळे स्मृती व्याख्यानात ‘अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन’ हा त्यांच्या विषय होता. रोटरीचे पदाधिकारी सुबोध जोशी, संजय बापट, किशोर माने व्यासपीठावर होते. बजाज म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष विरोधात असताना अनेक वेळा गोंधळ घालत होता. सरकार चालविणे ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच आहे. त्यामुळे भाजपने विरोधकांना सन्मानाने वागणूक देऊन कामकाज चालविले पाहिजे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘आपल्याकडील सरकारी नोकरशाहीच्या कामाचा दर्जा खासगी क्षेत्रापेक्षा चांगले पगार असूनही अत्यंत सुमार आहे. आपल्या देशात एकूणच हक्कांची जाणीव अधिक व जबाबदारीची जाणीव कमी आहे. मागणी वाढली, गुंतवणूक वाढली तर उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकेल. समाजवादी औद्योगिक धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले. चुकीच्या पद्धतीने समाजवाद राबविला गेल्याने काही मूठभर राजकारणी आणि उद्योगपतींचे कल्याण झाले. १९७० ते ९०च्या काळात भ्रष्ट पद्धतीचे व्यवस्थापन असलेल्या व्यवस्थेमुळे आपल्या देशाचे मोठे नुकसान झाले. आपली लोकशाही हे आपले सर्वांत मोठे बळ आहे. देशातील मध्यमवर्गाला प्रगतीची आस आहे. तेच देशाचे आशास्थान असून उज्ज्वल भवितव्यासाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही. ’’बजाज म्हणाले, ‘‘एअर इंडिया कंपनी बंद पडली, तरी देशाचे काही नुकसान होणार नाही. एअर इंडिया फक्त कामगारांसाठी चालविली जात आहे. ही कंपनी बंद पडू नये यासाठी कामगार संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी संप केला, तर अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल; त्यामुळे सरकारला हा प्रश्न काळजीने सोडवावा लागत आहे.’’ रोटरीचे पदाधिकारी चारू भावे यांनी प्रास्ताविक केले. मराठा चेंबरचे संचालक अनंत सरदेशमुख यांनी बजाज यांचा परिचय करून दिला.(प्रतिनिधी)४आपण गांधीवादी घराण्यातून आलो आहोत. एखाद्या नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्याची भाषा या देशात होणार असेल, तर आपले रक्त खवळून उठल्याशिवाय राहणार नाही, असे बजाज म्हणाले.
भाजपचा उद्दामपणा नडला
By admin | Published: May 01, 2015 1:05 AM