-प्रशांत ननवरे
बारामती: देशातील लोकसभा निवडणुकांसाठी २०२४ उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे. मात्र, भाजपने आत्तापासूनच ‘बारामती लोकसभा मतदार संघ’ टार्गेट केला आहे. भाजपने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तीन दिवस मुक्कामी येणार आहेत. भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी याबाबत माहिती दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करण्याचे संकेत भाजपने या दौऱ्याद्वारे दिल्याचे मानले जाते. २०१९ मध्येच लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सूचना केल्याची चर्चा होती. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. मात्र, बारामतीकरांनी भाजप उमेदवाराला नाकारले. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले होते.
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मोडीत काढण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या तीन दिवशीय दौऱ्याला लोकसभा निवडणुकीची किनार आहे. सीतारामन यांच्यासमवेत दौऱ्यात विधानपरिषदेचे आमदार तसेच बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी राम शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत.
१६ ऑगस्ट रोजी केंंद्रीय अर्थमंत्री सीतारामन या खडकवासला, भोर येथे, १७ ऑगस्टला इंदापूर , दौंड, तर १८ ऑगस्टला त्या बारामती आणि पुरंदरला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. याठिकाणी भाजपच्या वतीने स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच या पार्श्वभुमीवर सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी बारामतीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
...बारामती भाजप नेत्यांचे आतापासुनच ‘लक्ष्य’भाजपच्या विरोधात देशपातळीवर मोट बांधण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भुमिका महत्वाची ठरते. या पार्श्वभुमीवर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बारामतीत आतापासुन बारामतीत भाजप नेत्यांनी लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. यंदा प्रथमच खुद्द केंद्रीय मंत्री ३ दिवस मुक्काम करुन मतदारसंघात थांबणार आहेत. निवडणुक व्युहरचना आखण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या सहभागातून आखण्यात येणारी रणनीती औत्सुक्याची ठरणार आहे. विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी लोकसभा प्रभारीपदी निवड करुन त्यांच्या मतदारसंघाची महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.